Coronavirus Impact : इयत्ता 9 वी, 11 वी परिक्षा तसेच 10 वी च्या शेवटच्या पेपरसंदर्भात शिक्षण विभागाचा मोठा निर्णय (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील अत्यंत बिकट परिस्थिती आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. 14 एप्रिल पर्यंत असलेला लॉकडाऊन कोरोनामुळं 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी च्या दुसर्‍या सेमिस्टरच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. तसेच इयत्ता 10 वीचा राहिलेल्या एका पेपर संदर्भात देखील त्यांनी निर्णय घेतला आहे. दरम्यान, इयत्ता 10 वी चा शेवटचा म्हणजेच भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे.


23 मार्च रोजी इयत्ता 10 वी चा शेवटचा पेपर होणार होता. मात्र, तो कोरोनामुळं पुढं ढकलण्यात आला. त्यावर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होते. दरम्यान, काही संघटनांनी सरकारी मार्क देवून तो पेपर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या दुसर्‍या सेमिस्टरच्या परिक्षा रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.