कचरा वेचक असल्याच्या बहाण्याने वाहनचोरी करणारा जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कचरा वेचक असल्याचा बहाणा करून चारचाकी, दुचाकी चोरणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची एक चारचाकी, ७ दुचाकी, ५ मोबाईल असा साडेसात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिल्ला उर्फ रोहित प्रविण पवार (२०, गंगानगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे तपास पथक गस्त घालत असताना सापळा रचून दुचाकीवरून फिरणाऱ्या दोन संशयितांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसींनी पवार याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत सखोल तपास केल्यावर त्याने ही दुचाकी हडपसरमधून काही दिवसांपुर्वी चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक केली व त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पवार याला न्यायायलयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यानंतर पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडे तपास केल्यावर तो कचरा वेचक असल्याचा बहाणा करून पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान ज्या परिसरात सीसीटिव्ही नाही अशा ठिकाणी दुचाकी, मोबाईल चोरी करत होता. तसेच दिवसभर ती दुचाकी वापरून ती एखाद्या भागात सोडून देत होता. त्याच्याकडून तपासादरम्यान पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यातील ६, लष्कर व सांगवी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे आठ गुन्हे उघडकिस आणले. त्याच्याकडून चोरीच्या १ चारचाकी, ७ दुचाकी, ५ मोबाईल असा साडेसात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस क्रमचारी नितीन मुंढे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, युसुफ पठाण, संपत अवचरे, गोविंद चिवळे, अकबर शेख, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.