ग्रामपंचायत सदस्याच्या प्रसंगावधानाने केडगावमध्ये मोठ्या चोरीचा डाव फसला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे फ्लॅट फोडून मोठी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांच्या धैर्यामुळे फसल्याची घटना केडगाव येथील जगताप वस्ती येथे घडली आहे. चोरटे फ्लॅट फोडून चोरी करत असतानाच जगताप वस्ती येथे वास्तव्यास असणारे जगताप हे घटनास्थळी पोहोचल्याने चोरट्यांनी पळ काढला आणि त्यामुळे होणारा पुढील अनर्थ टळला आहे.

केडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नितीन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास जगताप हे पुण्यावरून घरी आले असताना त्यांच्या बाजूला असणाऱ्या एका फ्लॅटचा दरवाजा मोडलेल्या अवस्थेत असून एक तरुण तेथे उभा असल्याचे त्यांना दिसले त्यावेळी त्यांनी थोडे जवळ जाऊन पाहिले असता फ्लॅटच्या आतमध्येही काही तरुण असल्याचे त्यांना दिसले आणि हे चोरटेच असल्याची खात्री पटताच जगताप यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज देण्यास सुरुवात केली.

त्यामुळे चोरट्यांमध्ये भीती निर्माण होऊन त्यांनी मिळेल तो ऐवज घेऊन पोबारा केला. यावेळी प्रसंगावधान राखून जगताप यांनी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच केडगाव पोलिस चौकीचे हवालदार जितेंद्र पानसरे घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांसह संपूर्ण परिसराची पाहणी केली. नितीन जगताप यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे चोरट्यांचा फ्लॅट फोडून मोठी चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.

या चोरीमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला याबाबत माहिती मिळू शकली नाही. या घटनेबाबत केडगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून केडगाव मधील नागरिक दीपावलीच्या सणाचा आनंद लुटण्यासाठी पाहुण्यांकडे गेल्याची संधी साधून बंद फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न चोरटे करत आहेत त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागरूक राहून खबरदारी घेण्याचे आवाहन केडगाव पोलिसांनी केले आहे.

Visit : Policenama.com