खोदकामात विजवााहिन्या तुटल्याने नऊ हजार वीजग्राहक अंधारात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागील चार दिवसांमध्ये आठ ठिकाणी महावितरणच्या ११ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या खोदकामात तोडण्यात आल्या आहेत. यामुळे स्वारगेट, टिळक रोड, सुभाषनगर परिसरातील नऊ हजार वीजग्राहकांना याचा फटका बसला आहे. सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत करत आहेत.

दरम्यान, आज (शुक्रवारी) वीजवाहिनी तोडल्याने दुपारी दोन वाजता सुभाषनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळपर्यंत 90 टक्के भागात वीजपुरवठा सुरु करण्यात आला तर उर्वरित दोन रोहित्रांचा वीजपुरवठा दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी, की पर्वती विभाग अंतर्गत स्वारगेट, टिळकरोड, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, चाटे कॉलनी, तहसील कार्यालय आदी परिसराला स्वारगेट व सुभाषनगर या दोन ११ केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या पुणे महानगरपालिकेकडून नेहरू स्टेडीयम येथे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरु आहे. तसेच महालक्ष्मी मंदिर ते सारसबाग दरम्यान महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या खोदकामात या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आठ वेळा तोडण्यात आले आहे. यात पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात पाच ठिकाणी तर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या खोदकामात तीन ठिकाणी वीजवाहिनी तुटली. सुभाषनगर वीजवाहिनी तीन ठिकाणी तर स्वारगेट वीजवाहिनी पाच ठिकाणी तोडण्यात आली आणि बहुतांश वेळा रात्रीच्या सुमारास हे प्रकार घडले आहेत.

महावितरणचे अभियंते व कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र महावितरणशी समन्वय न साधता सुरु असलेल्या या खोदकामांचा दोन्ही वीजवाहिन्यांवरील सुमारे ९ हजार ग्राहकांना नाहक फटका बसला असून महावितरणचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. गेल्या चार दिवसांत या दोन्ही वीजवाहिन्यांवरील ग्राहकांचा एकूण १० तास वीजपुरवठा खंडित राहिला. महावितरणकडून या प्रकारांबाबत संबंधीत संस्थांना कळविण्यात आले असून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.