पोलिसांमुळे व्यापाऱ्याला मिळाले रिक्षात विसरलेले सामान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भोर येथील व्यापारी पुण्यातील विक्रेत्यांना सामान देण्यासाठी आला होता. रिक्षामध्ये सामान ठेवून रिक्षा चालकाला पुढे जाण्यास सांगितले. मात्र, व्यापारी रस्ता चुकला. रिक्षा चालकाने व्यापाऱ्याची वाट पाहिली परंतु तो न आल्याने रिक्षा चालकाने सामान खडक पोलिसांच्या स्वाधीन केले. रिक्षा चालकाने इमानदारीने सामान परत केल्याने खडक पोलिसांनी रिक्षा चालकाचे अभिनंदन करुन व्यापाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्याचा शोध घेऊन त्याचे रिक्षात विसरलेले सामान परत कले. पोलिसांमुळे हरवलेले सामान परत मिळाल्याने व्यापाऱ्याने पोलिसांचे आणि रिक्षा चालकाचे अभार मानले.

खडक पोलिसांनी पोती आणि ट्रॅव्हल एजंन्सीकडे चौकशी करुन व्यापाऱ्याचा शोध घेत त्याचे किंमती सामान परत केले. १० पोती वेफर्स, शेंगदाणे, नमकीन आणि अन्य खाद्य पदार्थांची पोती व्यापाऱ्याने रिक्षात ठेवली होती. कोंढवा परिसरातील लहान दुकानदारांना सामान देण्यासाठी हा व्यापारी भोर येथून बसने पुण्यात आला होता. बसमधून सामान उतरवून ते रिक्षात ठेवून बागवान मशिद येथील दुकानात सामान पोहच करायचे असल्याचे रिक्षा चालकास सागून त्याला पुढे जाण्यास सांगितले. व्यापाऱ्याने रिक्षा चालकाला मी पाठीमागून येतो असे सांगितले. रिक्षा चालक सामान घेऊन कोंढवा येथील बागवान मशिद येथे पोहचला मात्र, व्यापारी रस्ता चुकल्याने ते कोंढवा येथे पोहचू शकला नाही.

एक तास झाला तरी व्यापारी येत नसल्याने रिक्षा चालकाने सुभाष चौकीत सर्व सामान जमा करुन सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी पोती आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर शोधून काढला. व्यापाऱ्याला पोलीस चौकीत बोलवून त्याचे रिक्षात विसरलेले सामान परत केले.