पुणे पोलिसांच्या ‘भरोसा’ संकल्पनेमुळे मुलीला मिळाला न्याय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कुणावरही अन्याय झाल्यास तक्रार करण्याआधी आपल्या मनात नको नको ते विचार येत असतात. तक्रार केल्यावर आपल्याला त्रास तर होणार नाही ना ? आपल्यावर अन्याय तर होणार नाही ना ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घर करतात. शिवाय मनात पोलिसांबद्दल भीती निर्माण होत असते.तर काहींना असे देखील वाटेत ‘नको त्या फंद्यात कोण पडेल जाऊ द्या !

एवढे बोलून सर्वच प्रकरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.
दत्तवाडी भागात अशीच एक घटना घडली. हिम्मत असूनही केवळ परिस्थितीमुळे व परिवारातील कुणाचाही खंबीर पाठिंबा नसल्याने मुलीने तक्रार केली नाही. जाणून घेऊयात नेमके काय होते प्रकरण.

दत्तवाडीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या परंतु शिक्षणाच्या जोरावर परिस्थिती बदलण्याची जिद्द असणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने अडसर आणण्याचा प्रयत्न केला. एकतर्फी प्रेमातून हा तरुण तिला वारंवार त्रास देत होता. ही घटना ती सांगणार तरी कोणाला.वडिलांचा अपघात झाल्याने ते काहीही कामधंदा करु शकत नव्हते. घरात कोणाचा खंबीर पाठिंबा देखील नव्हता. आईला ही बाब सांगावी तर ती बिचारी कशी बशी चार घरचे धुणे भांडे करून संसाराचा गाडा पुढे नेत होती. तरुणाचा त्रास सहन करण्याशिवया तिच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता.

दोन दिवसांपूर्वी तरुणाने या पीडित मुलाला रस्त्यामध्ये आडवले आणि तिची छेड काढली. मात्र, यावेळी तिला याचा त्रास सहन न झाल्याने अखेर तिने तिच्या आईला या प्रकरणाबाबद सांगितले. गरिबीमुळे इतरांप्रमाणेच त्यांना देखील अनेक प्रश्न सतावत होते. मात्र हार न मनता महिला, बालके आणि जेष्ठ नागरिकांच्या समस्यांसाठी पुणे शहर आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतील ‘भरोसा’ सेल द्वारे त्यांनी तक्रार करण्याचे ठरविले. तक्रार करताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी प्रथम सर्व प्रकरण समजावून घेऊन पोलीस उप निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना मुलीची फिर्याद नोंदवून घेण्यास सांगून आरोपीला अटक करण्याच्या सुचना देण्यात आल्या. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी आरोपी किरण भागवत कदम (वय १९ रा. किश्कींधानगर, कोथरूड पुणे) याच्या विरुद्ध कारवाई करून अवघ्या अकरा तासांतच आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.