दोन मंत्र्यांच्या वादात पंतप्रधानांच्या सभेचे स्थळच ठरेना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. हे निाश्चित झाले आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू असली तरी सहकार मंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वादात सभा नेमकी कोठे घ्यायची हे निाश्चित होत नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या प्रकाराने प्रशासन हतबल झाले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या सभेचा ‘राजकीयलाभ’ घेण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे मोदी यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे पंतप्रधान मोदी यांची सभा आपल्या मतदारसंघालगत असणाऱ्या विष्णू मिल मैदानावर घेण्यासाठी ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांचा दौरा अगदी आठ दिवसांवर आला असताना सभेचे स्थळ निश्चित झाले नसल्याने महसूल व पोलिस यंत्रणेसमोर तिढा निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा स्थळाची निवड करण्यासाठी बुधवारी मंत्रीव्दयांनी विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालय मैदान, सिद्धेश्वर कारखान्याजवळील मैदान, जुने सोलापूर येथील अंबर हॉटेल समोरील मैदान, विष्णू मिल मैदानाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त महादेव तांबडे आदी अधिकारी उपस्थित होते. सभा स्थळ निश्चित न झाल्याने आता महसूल व पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक शुक्रवारी बोलविण्यात आली आहे.