जगज्जेत्या जर्मनीचे आव्हान संपुष्टात

 कझान : वृत्तसंस्था

जगज्जेत्या जर्मनी संघाचे यंदाच्या फिफा वर्ल्डकपमधील आव्हान साखळीतच संपुष्टात आले आहे. दक्षिण कोरियाने ‘एफ’ गटातील शेवटच्या सामन्यात बलाढ्य जर्मनीला २-० अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का देत भूकंप घडवला असून जर्मनीच्या चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. दरम्यान, १९३८ नंतर प्रथमच जर्मनीवर बाद फेरीआधीच गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे.

‘एफ’ गटातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात जर्मनीला आज दक्षिण कोरियाविरुद्ध विजय आवश्यक होता. त्यामुळेच जगज्जेतेपदाला साजेशी खेळी करून जर्मनी संघ मोठा विजय मिळवेल व अंतिम १६ संघांमध्ये स्थान मिळवेल, अशा आशा जर्मन फॅन्सना होत्या. मात्र, दक्षिण कोरियाने जर्मनीचे मनसुबे उधळून लावले.

[amazon_link asins=’B072X2BGM5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7eef6303-7a2b-11e8-b309-35a9522bb79a’]

सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी राहिली. दक्षिण कोरियाचा डिफेन्स जर्मनीच्या स्टार स्ट्रायकर्सना भेदता आला नाही. मध्यंतरानंतरही जर्मनीचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाही. उलट ९० मिनिटांच्या खेळानंतर इंज्युरी टाइममध्ये ९३व्या मिनिटाला कोरियाच्या किमने गोल डागत जर्मनीवर १-० अशी आघाडी आपल्या संघाला मिळवून दिली. पाठोपाठ ९६व्या मिनिटाला सोनने आणखी एक गोल डागला आणि जर्मनीच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. या पराभवानंतर जर्मनीच्या चाहते आणि खेळाडूंनाही अश्रू आवरता आले नाही.