दारू सोडवायला आले आणि जग सोडून गेले, आैषध पिल्यावर दोघा भावांचा मृत्यू

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – दोन सख्या भावांची दारू सोडवण्यासाठी उपचारा करिता हदगाव शहरातील एका भोंदू डॉक्टरकडे आणले होते. या डॉक्टरने दोघांना औषध दिले. यानंतर दोघांना घेऊन कुटुंबिय परतीच्या प्रवासाला लागले असता वाटतेच प्रथम एका भावाचा मृत्यू झाला तर काही वेळातच दुसऱ्या भावानेही प्राण सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
संजय ज्ञानदेव मुंडे (४०) व विजय ज्ञानदेव मुंडे (३५ दोघेही रा. तळेगाव, ता. परळी जि. बीड) हे सख्खे भाऊ हदगांव येथील एका खाजगी डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आले होते. त्यांना येथील डॉक्टर रवींद्र पोधाडे यांनीे पिण्याचे औषध दिले. ते औषध घेऊन ते कुटुंबियांसह परतीच्या प्रवासाला लागले. सुमारे ३० किलोमीटर जाताच पोटात आग होते व जीव कासाविस होतोय असे संजय मुंडे म्हणाले. त्यास पिण्याचे पाणी दिले. नंतर तो झोपला. त्याला नांदेडला पोहोचल्यावर उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठत नसल्याने एका खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मृत्यू पावल्याचे सांगितले. तेथून पुढे ते सर्वजण गावाकडे निघाले असता आणखी पन्नास किलोमीटर गेल्यावर दुसरा रुग्ण विजय मुंडे याला त्रास जानवू लागल्यामुळे त्याला लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तो सुद्धा मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नांदेड येथून माहिती कळाल्यानंतर गावाकडील नातेवाइकांनी धाव घेत लोहा गाठले. त्यांनी भ्रमणध्वणीद्वारे हदगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली व दोन्ही मृतदेह घेऊन हदगाव पोलीस ठाणे गाठले. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. मृतदेह शवागारात ठेवून पोलिसांनी डॉ. रवींद्र पोधाडेच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.