शाळेसमोर महिलेसह दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या दोन भाच्यांना शाळेतून आणण्यासाठी महिला गेली. कार पार्क केली आणि मुलांना घेऊन गाडीत बसत होती, तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती कारमध्ये घुसला. महिलेने प्रतिकार करत झटापट केली. तेव्हा तो गाडीबाहेर पडला आणि साथीदारासह पसार झाला. या घटनेनंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अलंकार पोलिसांनी एक दिवसानंतर गुन्हा दाखल केला. हा प्रकार गुरुवारी एरंडवणे येथील अभिनव इंग्लीश स्कूलसमोर घडला.

याप्रकरणी श्रीकृपा अविनाश पारनाईक (४९, कोथरुड) या महिलेने यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृपा पारनाईक या एका बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या ८ वर्षे आणि ६ वर्ष वयाच्या दोन भाच्या एरंडवण्यातील अभिनव शाळेत शिक्षण घेतात. गुरुवारी दुपारी त्या दोघींना घेण्यासाठी कारने गेल्या. त्यावेळी कार कॅनल रोडजवळ पार्क करून दोन्ही मुलींना घेऊन कारमध्ये बसल्या. श्रीकृपा यांनी दोघींना कारमध्ये बसविले. परंतु त्या कारमध्ये बसत असताना अचानक एकजण तेथे आला. कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी श्रीकृपा यांनी त्याचा प्रतिकार केला. तेव्हा तो कारमधून खाली पडला. त्याचवेळी समोरच एकजण दुचाकीवर उभा होता. बाहेर पडल्यावर तो दुचाकीचालकासह पसार झाला. त्यानंतर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि तक्रार दिली. पोलिसांनीही या संदर्भात एक दिवासनंतर गुन्हा दाखल केला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा चौधरी करत आहेत.