गुन्हे शाखेचा तोतया पोलीस अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या,  चाकण परिसरातील व्यापाऱ्यांना आपण गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून हप्ते गोळा करणाऱ्या एका तोतया पोलिसाला पोलिसांनी अटक केली आहे.

राजेंद्र मोहन पोटकर (५५, रा. पिंपरी-चिंचवड) याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोटकर याने पुणे शहरात अनेकदा यापूर्वी आपण पोलीस असल्याचे सांगून व्यापाऱ्यांना लुबाडले आहे. तसेच व्यापाऱ्यांना मारहाण केली असल्याने तसे गुन्हे दाखल आहेत. याने चाकण परिसरात जाऊन एका पान टपरी दुकानदारास मारहाण केली, आपण गुन्हे शाखेचा उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी त्याचा तपास करुन भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

पोटकर हा पानटपरी, किराणा दुकानदार आणि हॉटेल चालकांकडून हप्ते घेत होता. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी देत असल्याने हॉटेल चालक आणि छोट्या व्यवसायिक त्याला घाबरुन होते. याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.