तोतया पोलिसांनी भरदिवसा दोघांना लुटले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – फलटण शहरातील गजबजलेल्या डी. एड. चौक ते प. पू. उपळेकर महाराज मंदिर रस्त्यावर दुपारच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी पोलीस असल्याचे सांगत दोन व्यक्तींच्या अंगावरील दागिने, मोबाईल व अन्य चीजवस्तू बतावणी करत हातचलाखीने लंपास केल्या. दागिने घालून का फिरताय, तुमच्याकडील रूमालात काढून ते आत ठेवा असे या तोतया पोलिसांनी या दोघांना सांगितले. तसेच दागिने व अन्य वस्तू रूमालात बांधून ठेवताना हातचलाखीने दागिने लंपास करून पळ काढला. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याबाबत विश्वनाथ हरिभाऊ शिंदे (७८, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी २ वाजता शहरातील गजबजलेल्या वस्तीमधील डी.एड. चौक ते प. पू. उपळेकर महाराज मंदिर रस्त्यावर पायी चालणाऱ्या एका गृहस्थास काळया रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी थांबण्यास सांगून आपण पोलीस आहोत, तुमच्या चीजवस्तू काढून द्या, असे सांगितले. तसेच त्यांच्याकडील चीजवस्तू काढून घेवून रुमालात बांधून त्यांच्याकडे दिल्या. त्यानंतर दोन्ही दुचाकीस्वार शिंदे यांच्याकडे आले. साधारण ३५ ते ४० वयोगटातील या दोघांपैकी दुचाकीवर पुढे बसलेल्या इसमाने काळया पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व जीन्स पॅण्ट घातली होती, तर मागे बसलेल्या इसमाने फुल बाह्यांचा शर्ट व पॅण्ट घातली होती. त्यांनी तुम्ही सोन्याची चेन व अंगठी घालून का फिरत आहात. आम्ही पोलीस आहोत, तुमच्याजवळील रुमाल काढा व त्यामध्ये दागिने, मोबाईल ठेवा, असे सांगितले.

त्याप्रमाणे शिंदे यांनी जवळच्या रुमालात २ मोबाईल, समाजभूषण ओळखपत्र, सोन्याच्या २ अंगठ्या, गळ्यातील चेन रुमालामध्ये ठेवली. त्यावेळी मोटरसायकलवर मागे बसलेल्या इसमाने खाली उतरून रुमालास गाठ मारुन तो शिंदे यांच्या खिशात घातला व जाण्यास सांगितले. तेथून शिंदे हे डॉक्टर जोशी हॉस्पिटलपर्यंत चालत गेले व दोघे दुचाकीस्वार डी. एड. चौकाकडे निघून गेले. शिंदे यांनी जोशी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर खिशातील रुमाल काढून गाठ सोडून पाहिले असता त्यामध्ये २ मोबाईल व ओळखपत्र एवढेच राहिले होते. सोन्याच्या २ अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन त्या दोघा अनोळख्या दुचाकीस्वारांनी हातचलाखीने काढून घेवून त्यांची फसवणूक केली होती. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.