अजान सुरू होती म्हणून आदित्य ठाकरेंनी ‘या’ खासदाराचे भाषण थांबवले 

बुलढाणा : पोलीसनामा आॅनलाईन – मेहकर येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू होता. यावेळी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे भाषण सुरू असताना अचानक मुस्लिमांचे अजान सुरू झाले. यावेळी अजानचे धार्मिक महत्व जाणून आदित्य ठाकरे यांनी खासदार जाधव यांना अजान संपेपर्यंत भाषण थांबण्याचा इशारा केला. अजान संपल्यावर पुन्हा खासदार प्रतापराव जाधव यांनी भाषण सुरू केले. यामुळे अन्य धर्मांबद्दल आदित्य ठाकरेंना असलेला आदर बुलडाण्यातील नागरिकांनी अनुभवला.

आत्महत्या केलेल्या २५० कुटुंबीयांना २ महिन्यांचे संपूर्ण किराणा साहित्य व साडी-चोळी देण्याकरिता आदित्य ठाकरे हे बुलडाण्यातील मेहकर येथे आले होते. त्यांच्या सोबत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख धीरज लिगाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

एका मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक खासदार जाधव यांच्या भाषणादरम्यान दुपारची अजान सुरू झाली. अजान सुरू असतानाही जाधव यांनी भाषण सुरूच ठेवल्याने अजानचा सन्मान राखत आदित्य ठाकरे यांनी अजाननंतर भाषण करण्याचा इशारा खासदार जाधव यांना केला. त्यामुळे काही काळ जाधव यांनी भाषण थांबवले. याप्रकारावरून आदित्य ठाकरे यांचा सर्वधर्माप्रती असलेला आदर दिसून आला. या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी दाखवलेल्या सर्वधर्म समभावाची चर्चा शिवसैनिकांसह नागरिकांमध्ये सुरू होती.