प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, बिहारमध्ये RJD नेत्याची गोळ्या घालून हत्या

पोलीसनामा ऑनलाईन : बिहारमध्ये राजदच्या एका युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेची प्रसूतीदरम्यानच त्याच्या पत्नीला बातमी कळाली. मृताच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलाची अज्ञांतानी गोळ्या घालून हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये ही ह्दयद्रावक घटना घडली आहे.

दोन दिवसापूर्वी भोजपूरच्या आरा येथील शेहरी गावात राहणारा हरिद्वार सिंग याचा मुलगा राजदचे (आरजेडी) युवा नेता रवि यादव याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार मारले. गुरुवारी सकाळी रामडीहरा रोडच्या काठावरील करहा येथे रविचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रवि हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याच वर्षी रवीचे दुलौर गावातील प्रियांशुशी लग्न झाले. प्रियांशु गर्भवती होती. पण, रवि यादव आपल्या मुलीला पाहण्यापूर्वीच या जगातून निघून गेला. एकीकडे अंत्ययात्रेची तयारी सुरु होती, तर दुसरीकडे पत्नीला प्रसूतीच्या वेदना असाह्य होऊ लागल्या होत्या. त्यानंतर प्रियांशुला गडहनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तेथेच तिने एका मुलीला जन्म दिला.

मृत रवी यादव बुधवारी संध्याकाळी मंदुरी येथील आपल्या घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. पण रात्री उशिरापर्यंत तो घरी पोहचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली असता गुरुवारी सकाळी दुचाकीसह रविचा मृतदेह गावाजवळ पडला.

घटनास्थळावरुन तीन खोके देखील जप्त केले असून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी, स्थानिक लोकांनी आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मारेकऱ्यांच्या अटकेसाठी मृतदेहासह आरा-सासाराम राज्य महामार्ग रोखला होता. मात्र, डीएसपीने मारेकऱ्यांना अटक करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर जाम झालेला महामार्ग खुला केला. यानंतर मृतदेह आरा सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.