‘लॉकडाऊन’ दरम्यान नवरा-नवरीनं सोशल डिस्टेन्सिंगचं केलं ‘पालन’, लाकडी काठीनं एकमेकांना घातल्या ‘वरमाला’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान एक अनोखा विवाह पाहण्यास मिळाला. वधू-वरांनी लाकडाच्या सहाय्याने नातेवाईकांच्या उपस्थितीत एकमेकांना माळा घातल्या, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वधू-वरांनी सोशल डिस्टेंसिंगचे केले पालन

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ लोकांच्या खूप पसंतीस पडत आहे. सर्वसाधारणपणे लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश बंद आहे आणि कुठेही कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सभांना, कार्यक्रमांना बंदी आहे. अशा परिस्थितीत, काही लोक खूप कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकून घेत आहेत, तर काही लोकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे.

कोरोना विषाणूमुळे देशाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 39,980 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 1,301 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10,633 लोक उपचारादरम्यान बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.