नाशिकमध्ये ‘पॅराशुट’ भरकटल्यानं जवान अडकला झाडावर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील गांधीनगर येथे विमानातून पॅराशुटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्याक्षिक करताना पॅराशुट भरकटल्याने एक जवान उपनगरातील बाभळीच्या झाडाला अडकला. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड तोडून त्याची सुटका केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेतील जवान सुखरुप असून त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे अग्निशामन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

नाशिक येथील आर्टिलरी प्रशिक्षण केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून पॅराशुटद्वारे उतरण्याच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी प्रशिक्षणार्थींना १३ हजार फुटावरुन उडी घेण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे प्रशिक्षणार्थींनी उड्या घेतल्या. हनिफ नापा हा प्रशिक्षणार्थी पॅराशुटद्वारे उतरत असताना हवा सुटल्याने त्याचे पॅराशुट भरकटले आणि उपनगरातील अमित काठे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला अडकले. अमित कोठे यांनी झाडाची फांदी तोडून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल ठरल्याने त्यांनी अग्निशामक दलाला कळविले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन झाड तोडले आणि जवानाची सुटका केली. हा प्रकार पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.