‘अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय कामी येते’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, ‘अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय कामी येते’ असे म्हटले आहे. इतकेच नाही तर, ‘माझा या जन्मावर विश्वास आहे त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय ‘ असेही आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे.

यावेळी बोलताना वैशाली येडे म्हणाल्या की, “अडचणीच्या काळात दिल्लीची नाय , गल्लीची बाय कामी येते.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली खरी पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार.” याव्यतिरिक्त, या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असे परखड शब्दात सांगून जगरहाटीने विधवापण लादल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

लेखक आणि कष्टकरी सारखेच आहेत हे सांगताना येडे म्हणाल्या की, “या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की, लेखक आणि कष्टकरी सारखेच आहेत. दोघांनाही भाव मिळत नाही. मात्र संमेलनाच्या निमित्ताने अभावाने जगणाऱ्याला भाव मिळेल ही आशा व्यक्त करते.”

https://twitter.com/Madan_Yerawar/status/1083619329633992704