कौतुकास्पद ! IAS अधिकार्‍याची कर्तव्यनिष्ठा, प्रसुतीनंतर अवघ्या 14 दिवसात ऑन डयुटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोविड १९च्या संकटकाळात देशातील प्रशासन यंत्रणा दिवसरात्र झटत असून कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्याही सुट्ट्या कमी व काम जास्त अशी अवस्था झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार यांसह संपूर्ण प्रशासनावर कामाचा ताण पडत आहे. यामध्ये आपल्याला अनेक अनुभव पाहायला मिळाले आहेत. असाच एक अनुभव गाझियाबाद आला. त्यामध्ये गाझियाबादच्या एका महिला नोडल ऑफिसरने प्रसुतीनंतर केवळ १४ दिवसांत ड्युटी जॉईन करुन आदर्श निर्माण केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा आपल्या आईंच्या निधनानंतर केवळ ३ दिवसांत विधी उरकून कामावर हजर झाले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत जी प्रेरणदायी व आपत्कालीन परिस्थितीत आदर्श बनली आहेत. गाझियाबाद जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सौम्या पांडे यांची ७ महिन्यांची गर्भवती असताना जुलै महिन्यात गाझियाबाद येथे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त झाल्या होत्या.त्यावेळी, जिल्ह्यात दररोज १०० कोविडचे रुग्ण आढळून येत होते.या काळात त्या प्रसुतीरजा घेऊन सुट्टीवर जाऊ शकत होत्या, मात्र कोरोना काळात आपले कर्तव्य बजावण्यास त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. सध्या कार्यालयातच त्या आपल्या बाळासह हजर राहतात.

सौम्या पांडे यांनी १७ सप्टेंबर रोजी मेरट रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुतीनंतर अवघ्या १४ दिवसांनी म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी ते आपल्या बाळासह ड्युटीवर हजर झाल्या. सौम्या पांडे म्हणाल्या कि कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेकजण न थकता आपलं कर्तव्य पार पाडत आहे, ते पाहून मीही माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी केवळ २२ दिवसांची प्रसुती रजा घेऊन, १४ दिवसांत पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाली आहे. सौम्या पांडे यांनी २०१६ मध्ये देशात 4 थ्या क्रमांकाने युपीएससी परीक्षा पास केली होती. त्यानंतर २०१९ साली त्यांची गाझियाबादच्या जिल्हा-दंडाधिकारीपदी नियुक्ती झाली.