हत्या झालेल्या सरपंचाच्या वडिलांना अतिरेक्यांच्या ‘या’ कृत्याबद्दल वाटते दु:ख

श्रीनगर : मला दु:ख याचे आहे की, दहशतवाद्यांनी माझ्या मुलाच्या पाठीवर गोळ्या घातल्या, अशा शब्दात द्वारिकानाथ पंडित यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.


अंनतनाग जिल्ह्यातील लाकीपीरा भागातील सरंपच आणि काँग्रेसचे सदस्य अजय पंडित (वय ४०) यांची गावात अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याची माहिती मिळताच जखमी अवस्थेत अजय पंडित यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.

काँग्रेसचे खासदार व नेते राहुल गांधी यांनीही अजय पंडित यांच्या हत्येविषयी दु:ख व्यक्त केले आहे. पंडित हे एक समर्पित पक्ष कार्यकर्ते होते, असे त्यांनी म्हटले आहे.

याविषयी अजय पंडित यांचे वडिल द्वारिकानाथ पंडित यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी माझ्या मुलाच्या पाठीवर गोळ्या घातल्या़. अजय पंडित यांना २ मुली आहेत. असे असले तरी आम्ही आमचे मुळ गाव सोडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अतिरेक्यांच्या हिसांचारानंतर काश्मीर खोर्‍यातून हिंदु पंडितांनी मोठ्या प्रमाणावर पलायन केले. अंनतनाग जिल्हा हा अतिरेक्यांच्या कारवायांनी सर्वाधिक त्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. असे असूनही अजय पंडित हे आपल्या वडिल व मुलींसह आपल्या जन्मगावात ठामपणे अजूनही राहत होते. त्यांच्या कामामुळे गावकर्‍यांनी त्यांना सरपंच म्हणून निवडून दिले. ही गोष्ट अतिरेक्यांना खुपत होती. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्येची आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नाही.