ड्वेन ब्राव्होने MS धोनीला दिली खास भेट, वाढदिवसाच्या दिवशी रिलीज केले ‘हेलिकॉप्टर -7’ गाणे (व्हिडिओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा आज 39 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी सहकारी खेळाडूंसह जगभरातील क्रिकेटपटूही माहीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जमधील त्याचा सहकारी खेळाडू ड्वेन ब्राव्होने माहीला त्याच्या वाढदिवशी एक खास भेट दिली आहे. थाला च्या खास दिवशी त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी ब्राव्होने हेलिकॉप्टर 7 गाणे रिलीज केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी संध्याकाळी ब्राव्होचे गाणे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले.

हेलिकॉप्टर 7 ने घेतलीये उड्डाण – सीएसके
CSK ने ब्राव्होचे गाणे शेअर करत लिहिले की, ‘हेलीकॉप्टर 7 ने घेतलीये उड्डाण. ड्वेन ब्राव्होचा थाला एमएस धोनीला ट्रिब्‍यूट. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एमएस धोनी.’ दरम्यान,ब्राव्होने हेलिकॉप्टर 7 गाण्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे. या गाण्यात ब्राव्होने माहीच्या संघर्षापासून त्याच्या आयसीसीची तिन्ही पदके जिंकण्याचा उल्लेख केला. ब्राव्हो स्वतः धोनीचा मोठा चाहता आहे आणि आयपीएलमध्ये या दोघांमध्ये जोरदार बॉन्डिंग आहे हे कुणापासून लपवलेले नाही.

ब्राव्होच्या या गाण्याला लोकांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे हे गाणे शेअर केल्यानंतर थोड्याच वेळात ते व्हायरल झाले. आतापर्यंत लाखो लोकांनी हे गाणे सोशल मीडियावर पाहिले आणि शेअर केले आहे. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणारा ब्राव्हो संगीत जगतातही नाव कमावत आहेत. यापूर्वी ब्राव्होने ‘डीजे ब्राव्हो’ नावाचे गाणे तयार केले होते, जे लोकांच्या पसंतीस उतरले होते.