…तर बायको घरातून हाकलून देईल, अजित दादांनी कार्यकर्त्यांना सांगितली ‘प्रेमळ’ अडचण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीतले कार्यकर्ते काही कामानिमीत्त मुंबईत येतात त्यावेळी मी थोडा नाराज होतो. मुंबईतलं माझं घर लहान आहे. सरकार स्थापन होऊन 100 दिवस होत आले तरी अद्याप मला सरकारी बंगला मिळाला नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. अजित दादांनी मेळाव्यात बोलताना दिलखुलास भाषण केलं.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुंबईत घर एकतर लहान आहे, तिथं बसायला जागा नाही, हॉलमध्ये गर्दी झाली की, डायनिंगमध्ये बसायला लागतं, तिथं गर्दी झाली की जयच्या बेडरुममध्ये बसायला लागतं. आता फक्त माझ्या बेडरुमध्ये बसायचं बाकी आहे. तिथं नेलं तर बायको हाकलून देईन, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच थोडं दमानं घ्या, दोन-चार दिवसांत देवगिरी रिकामा होईल, 100 दिवसांत काय केलं बाबानं, कुणास ठाऊक, अद्याप घर खाली केलं नाही, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपच्या माजी मंत्र्याला टोला लगावला.

100 दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक
भाजप सरकारच्या काळात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मलबार हिल येथील देवगिरी बंगला राहण्यासाठी दिला होता. नवीन सरकार येऊन 100 दिवस झाले तरी मुनगंटीवारांनी अद्याप देवगिरी बंगला रिकामा केला नाही. त्यामुळे अजित पवार सध्या चर्चगेटच्या एका इमारतीत वास्तव्यास आहेत. यावरुन मुनगंटीवार यांना टोला लगावताना अजित पवार म्हणाले, सरकार स्थापन होऊन 100 दिवस झाले तरी शासकीय बंगला अद्याप रिकामा झाला नाही. एवढे दिवस काय करतोय बाबा कुणास ठाऊक असा टोला त्यांनी लगावला.