जमावाच्या हल्ल्यात डीवायएसपी यांच्यासह सात पोलीस कर्मचारी जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन

धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील दुर्बळ्या गावातील दोन गटामध्ये असलेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या डीवायएसपी संदीप गावित यांच्या पथकावर गावक-यांनी हल्ला केला. या हल्ल्यात डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर आणि पाच ते सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संतापजनक घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गावीत आणि खेडकर यांना मुका मार लागला आहे.

दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली होती. त्याच्या नावावरील मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कारणावरून त्याचे आईवडील आणि सासरच्या मंडळीत वाद सुरू होता. एपीआय खेडकर यांच्या मध्यस्थीनंतर उभय पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचे मान्य केले होते.

मात्र नंतर पुन्हा वाद उफाळल्याने गावात आदिवासी समाज व दोन्ही पक्षांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठक सुरू असतांनाच तेथील महिलांच्या जमावातून पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यातून सावरत नाहीत तोच पुरुषांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर धावून गेला. महिला आणि तरूणांनी पोलीसांना मारहाण केली तसेच पोलीस गाड्याची तोडफोड करुन महिला कर्मचार्यांना धक्काबुक्की केली.

या हल्ल्यात गावित, खेडकर यांच्या हातावर मुका मार लागला. हवालदार संजय नगराळे, श्यामसिंह वळवी, अनंत पवार हे मारहाणीत जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला कर्मचारी यमुना परदेशी या गरोदर असून जमावाने ढकलून दिल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.