‘आम्ही नोकरी करतो , राजकारण नाही… असे मंत्र्यांना ठणकवणाऱ्या ‘त्या’ DYSP ला गृहमंत्री पदक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापुरात महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली होती. पण कोल्हापुरात या महापौर निवडीच्या गोष्टींबरोबरच कर्तव्यदक्ष पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची चर्चा जास्त झाली होती. आम्ही राजकारण करीत नाही नोकरी करतो…अशा शब्दात नेत्यांना पोलीसी खाक्या दाखवणाऱ्या सुरज गुरव यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. सूरज गुरव यांनी एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जाण्याची तयारी करतो असे सांगत हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना रोकठोक उत्तर दिले होते. त्यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या १०१ पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा समावेश आहे. यात सुरज गुरव यांचे देखील नाव आहे.
त्यावेळी नक्की काय झालं होतं ? – त्यावेळी कोल्हापुरात महापौर निवडीकरिता सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस -राष्ट्रवादीचे नगरसेवक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात दाखल झाले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाला ओळखपत्र दाखवूनच आत सोडण्यात येत होते. ओळखपत्र पाहून आत सोडण्यावरून आमदार हसन मुश्रीफ ,आमदार सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला. मात्र यावेळी पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरूनच ड्युटीला असलेले पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव आणि मुश्रीफ यांच्यात वादावादी झाली. यावेळी पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी ‘आम्ही नोकरी करतो, राजकारण करत नाही’ असे उदगार काढले . यावेळी काहीही बोलू नक…! असे आमदार मुश्रीफ यांना सांगितले.या प्रकारानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या प्रकारामुळे मोठा तणाव याठिकाणी निर्माण झाला होता.

सूरज गुरव यांनी बाणेदारपणे त्यांना सांगितले होते की ”एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो , पण भीती घालू नका. आम्ही कर्तव्य बजावत आहोत, राजकारण करत नाही. साहेब, आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही. आपण घरी जावे’. सूरज गुरव यांनी दबावासमोर न येता स्पष्ट वक्तेपणाची रोखठोक भूमिका घेतल्याने त्याची चर्चा आणि कौतुक सगळीकडे झालं होतं.