समलिंगी संबंधांमुळे धावपटू द्युतीच्या अडचणीत वाढ ; आता घरच्यांनीही सोडली ‘साथ’

ओडिशा : वृत्तसंस्था – भारताची जलद धावपटू द्युती चंदने एका मुलाखतीत आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली दिली होती. मात्र द्युतीच्या या प्रेमसंबंधांना तिच्या घरातूनच विरोध झाला आहे. तिच्या बहिणीने तिला तुरुंगात टाकण्याचा आणि घरातून बाहेर काढून देण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे द्युतीची वाटचाल आणखी खडतर होण्याची चिन्हे आहेत.

द्युतीच्या समलैंगिक संबंधांवर तिच्या मोठ्या बहिणीने नाराजी व्यक्त केली याविषयी माहिती देताना द्युती चंद म्हणाली की, ‘मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. माझ्या गावातील माझी नातेवाईक असलेल्या १९ वर्षीय मुलीशी माझे संबंध आहेत. भविष्यात आम्ही एकत्र राहू. सर्वोच्च न्यायलयानेही ३७७ कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. मात्र माझ्या बहिणीला हे पसंत नाही. माझ्या बहिणीने मला घरातून बाहेर काढण्याचा आणि तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. माझ्या भावाच्या पत्नीशी तिचे बिनसल्यानंतर त्यालाही तिने घरातून बाहेर काढले. तसेच, माझ्या बाबतीतही होईल. माझ्या मोठ्या बहिणीला घरात खूप मान आहे. पण मी सज्ञान असून माझे निर्णय घेऊ शकते यासाठीच या नात्याबद्दल सांगण्याचा निर्णय घेतला. त्येकाला नात्याचं स्वातंत्र्य असावं. मी नेहमीच समलैंगिक संबंध असलेल्या लोकांच्या अधिकारासाठी प्रयत्न केले. सध्या माझं लक्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकवर असून भविष्यात मला तिच्यासोबतच रहायला आवडेल.’

द्युती चंदने आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला.