पान मसाला आणि गुटखा नंतर राज्यात ‘या’ वर घातली बंदी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पान मसाला आणि गुटखानंतर राज्यात आणखी काही वस्तूवर बंदी घालण्याचा निर्णय राज्याच्या अन्न प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यात तंबाखूजन्य पदार्थांएवढीच ई-सिगरेट घातक असते म्हणून त्यावर बंदी घातली आहे. ई-सिगरेटसह वेप, ई-हुक्का तसेच हीट ऍन्ड बर्न सारख्या वस्तूंवरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने गतवर्षी जुलै महिन्यात सर्व राज्यांना ई-सिगरेटवर बंदी घालण्याची सूचना केली होती. ई-सिगरेटची खरेदी विक्री ऑनलाईन होते. या सिगरेटमुळे अनेक आजारसोबत कर्करोग होण्याचीही शक्यता दाट असते. अन्न प्रशासन विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ई-सिगरेटवर बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली होती.

ई-सिगरेटमध्ये लेड, क्रोमियम, निकल सारखे धातू आणि फॉर्मल डीहायड सारखे केमिकलचा समावेश असतो. याच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यासोबतच ई सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसांवर घातक परिणाम होतात. त्यामुळे राज्य सरकारने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.