Lockdown मुळे आता मोबाईल अन् लॅपटॉप Online मागवता येणार नाही ! सरकारकडून बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर सध्या याची ऑनलाईन डिलीव्हरी मिळणे शक्य नाही. तसेच स्मार्टफोन, लॅपटॉपची रिटेल दुकानेही सुरु करण्यास परवानगी नसल्याने या वस्तू खरेदी करता येणार नाही.

ई-कॉमर्स कंपन्यांनुसार, लॉकडाउन असणाऱ्या राज्यांमध्ये त्यांना मोबाईल फोनसह इतर गॅजेट्सची विक्री करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना ऑर्डर घेता येत नाही. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांच्या लॉकडाउन गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे की, या काळात केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी केली जाईल. Amazon ने आपल्या वेबसाईटवर, सरकारी गाईडलाईन्सनुसार आम्ही केवळ अत्यावश्यक सामानाची डिलीव्हरी घेत असल्याचे म्हटले आहे. रिलायन्स डिजीटलनेही, सरकारी निर्बंधांमुळे या पिन कोडची डिलीव्हरी होल्डवर असून सरकारच्या आदेशानंतरच इतर डिलीव्हरी स्वीकारल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.

Flipkart Mobile App वरही सरकारी नियमांनुसार, प्रत्येक झोनसाठी प्रोडक्टची उपलब्धता वेगवेगळी असल्याचे म्हटले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्या वस्तूंचा आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करायचा, ते राज्यांवर अवलंबून आहे. नंतर मोबाईल फोन आवश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. परंतु सध्या किराणा सामान, हेल्थ प्रोडक्ट आणि पर्सनल केअर आदी वस्तूंची ऑनलाईन डिलीव्हरी होत असल्याचे म्हटले आहे.