E-Pass नियमावलीवरुन चित्रा वाघ संतप्त; ‘नुसता गोंधळ झालाय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळत नाही. त्यावरून राजकारण तापले असताना आता राज्यात आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवासासाठी पुन्हा एकदा ई-पास लागू केला आहे. याच मुद्यावरून भाजपने पुन्हा ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. ‘राज्यात 1760 लोक वेगवेगळं बोलताहेत ज्याने नुसता गोंधळ झालाय’, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दी चेन’ या नियमावलीअंतर्गत राज्यात लॉकडाऊनसदृश्य नियम लावण्यात आले आहेत. आता तर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वीसारखाच ई-पास आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘हे काय आता नवीन…काल परवापर्यंत नवीन लॉकडाऊन नियमावलीत E-pass वगैरे नसणार म्हणून सांगण्यात आले. आता अचानक या माहितीने अजून लोकांचा गोंधळ वाढणार आहे. एखादी व्यवस्थित हेल्पलाईन तरी सुरू करा ज्याने लोकांना मदत होईल. राज्यात 1760 लोक वेगवेगळे बोलताहेत ज्याने नुसता गोंधळ झालाय.’

दरम्यान, राज्य सरकारने जुन्या नियमावलीत बदल करून नव्या नियमावलीत जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध लावले आहेत. त्यानुसार, जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा आहे. तसेच परजिल्ह्यातून कोणी जिल्ह्यात आल्यास त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, असे महाराष्ट्र पोलिसच्या ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आले आहे.