‘टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है’, फडणवीसांना सूचक इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्थापनेपासून भाजपात (bjp) असलेले नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी अखेर पक्षांतर करत राजकीय सीमोल्लंघन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची शरद पवार यांची सूचना असतानाही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (devendra fadnavis) नाव न घेता सूचक इशारा दिला. यावेळी जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळलं असेल की टायगर (tiger) जिंदा है, पिक्चर अभी बाकी है, असं जयंत पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील म्हणाले, अनेकांना शरद पवार यांनी घडवलं त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला, सोडून गेले, शरद पवार यांना ईडीची (ED) नोटीस दिली. सुडाचं राजकारण केलं गेलं ही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल असंही ते म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, एकनाथ खडसे 40 वर्षापासून ते काम करत आहेत. पण, पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहाच्या शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं. खडसेसाहेबांवर अन्याय झाला, कटकारस्थान रचली गेली असतील. खडसेंच्या अन्यायाबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहात प्रश्न विचारला होता. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असं मी त्यावेळी विचारलं होतं. त्याचं उत्तर आजही मिळालं नाही. आजही ते (भाजप नेते) टीव्हीवर कार्यक्रम बघत असतील. त्याना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है, अशी टोलेबाजी करत जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांना चिमटे काढले.

भाजपला रामराम ठोकून अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे कमळ मागे सोडत खडसेंनी आता राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (rohini khadse) देखील उपस्थित होत्या. तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भाजपला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा अनिल भाईदास पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपला दिला आहे.