सरकतेय ‘जमीन’ अन् पर्वतांची ‘उंची’ वाढतेय, पृथ्वीच्या आतील होणाऱ्या बदलांमुळे शास्त्रज्ञ ‘आश्चर्यचकित’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    पृथ्वीवरील पर्वतांची उंची वाढत आहे का? जमीन सरकत आहे का? असे तर नाहीना की पृथ्वीच्या प्लेट्स सरकल्यामुळे पर्वतांची उंची वाढत आहे. चुंबकीय ध्रुव बदलत आहे. या सर्वांमागील कारण शोधता शोधता वैज्ञानिकांना अशा नैसर्गिक प्रक्रियेचा शोध लागला आहे. ज्याला ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पृथ्वीच्या आत मध्यभागी उपस्थित असलेला भाग फिरत आहे. कदाचित या सर्व बदलांचे कारण हेच आहे. अर्बाना कॅंपेनमध्ये स्थित युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या भौगोलिक बदलाबद्दल अभ्यास केला आहे. हा अभ्यास पृथ्वी आणि ग्रह विज्ञान पत्रामध्ये प्रकाशित झाला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय च्या शास्त्रज्ञांना सखोल अभ्यास केल्यानंतर या गोष्टीचा ठोस पुरावा मिळाला आहे की पृथ्वीचा गाभा म्हणजेच कोर फिरत आहे. ज्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र बदलत आहे. या कारणास्तव चुंबकीय उत्तर ध्रुव कॅनडाहून सरकत सायबेरियात पोहोचला आहे. पीकिंग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक जियाओडोंग सॉंग म्हणाले की 1996 पासून आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. 1996 मध्ये आम्ही पृथ्वीच्या गाभ्यात एक छोटासा भूकंपीय बदल पाहिला होता. तो हळू हळू फिरत होता. मग आम्ही त्याचा सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली.

प्रोफेसर जियाओडोंग म्हणाले की जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप दराचा अभ्यास केला आहे. एकाच ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या काळाचा डेटा रेकॉर्ड केला. तेव्हा हे माहित झाले की पृथ्वीच्या आत कोर फिरल्यामुळे भूकंपाचे प्रमाण कमी अधिक होत आहे. तसेच ते म्हणाले कोर फिरण्यामुळे पृथ्वीच्या वरचा पृष्ठभाग आणि प्लेट्स एकमेकांना भिडतात किंवा सरकतात. याचा परिणाम पृथ्वीवरील पर्वतांच्या उंचीवरही होतो.

प्रो. सॉंग म्हणाले की भूकंपामुळे निर्माण झालेल्या भूकंपाच्या लाटा पृथ्वीच्या गाभ्याकडे जातात. जर कोर फिरत नसेल म्हणजेच थांबलेल्या अवस्थेत असेल तर या भूकंपीय लाटा आत जाऊ शकत नाही. मग या लाटा आतून टक्कर देत परत येतात. भूकंपाच्या लाटांच्या हालचाली दरम्यानचा काळ, त्यांचे दर दर्शवतात की पृथ्वीचे केंद्र फिरत आहे. आम्हाला जगभरातील अनेक भूकंप केंद्रांमधून या लाटांच्या नोंदी मिळाल्या आहेत. जर पृथ्वीच्या मध्यभागी गरम लोहाचे केंद्र फिरले नाही तर या लाटा परत येत नाहीत. त्या तिथेच थांबतात. ज्या आतील गाभ्याकडे जाऊन परत येतात, त्यांच्या वर्तनात बदल होतात. यामुळे, पृथ्वीच्या प्लेट्स प्रभावित होतात.