24 तासात तिसर्‍यांदा भूकंपाच्या झटक्यांनी हादरले नाशिक, लोकांमध्ये भितीचे वातावरण

नाशिक : वृत्त संस्था – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून लागोपाठ भूकंपाचे धक्के बसत आहेत. काल अर्ध्यातासाच्या कालावधीत नाशिकमध्ये दोन वेळा भूकंपाचा धक्का बसला, तर आज सकाळी पुन्हा नाशिकची जमीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. लागोपाठ होत असलेल्या भूकंपामुळे येथील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. लोक घरात भितीच्या सावटाखाली आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, बुधवारी सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.2 नोंदली गेली. तर मंगळवारी सकाळी सुद्धा दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहिला धक्का सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी जाणवला आणि दुसरा झटका 10 वाजून 15 मिनिटांनी जाणवला.

मंगळवारी बसलेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 3.8, तर दुसर्‍या धक्क्याची तीव्रता 2.5 नोंदली गेली आहे. लागोपाठ बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरले आहेत. तीन दिवसांपूर्वी सुद्धा रात्रीच्या वेळी नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, या धक्क्यांनी कोणतेही नुकसाने झाल्याचे वृत्त अद्याप नाही, परंतु लोकांमध्ये भिती कायम आहे. लोक घरातून बाहेर पडले होते.