देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर, बंगळुरू प्रथम तर पुणे व्दितीय क्रमांकावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने भारतातील राहाण्यासाठी सर्वोत्तम जीवनमान (Ease of Living Index) असलेल्या शहरांची यादी गुरुवारी (दि. 4) जाहीर केली असून यात बंगळुरू हे सर्वोत्कृष्ट शहर ठरले आहे. तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमधल्या अहमदाबादने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबई दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे भारताची राजधानी असलेेले दिल्ली मात्र थेट 13 व्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी 2018 मध्ये अशा प्रकारची यादी विभागाकडून जाहीर केली होती. त्यावेळी सर्वच शहरांना एकाच श्रेणीत ठेवत क्रमांक दिले होते. यंदा मात्र विभागाकडून शहरांची 2 गटात विभागणी करून यादी तयार केली आहे. यात 10 लाखांपेक्षा कमी आणि 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहर असे गट तयार केले होते. पहिल्या गटात 49 शहर असून दुसऱ्या गटात 62 शहर आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा दुसरा क्रमांक लागला आहे. या यादीत नवी मुंबई चौथ्या क्रमांकावर असून मुंबईचा क्रमांक दहावा आहे. चेन्नईचा चौथा क्रमांक लागतो. तर दिल्ली मात्र 13 व्या क्रमांकावर आहे. या शहरांचा जीवनमान दर्जा ठरवताना 4 प्रमुख गोष्टी पाहिल्या गेल्या. यात तेथील राहणीमान, आर्थिक क्षमता, शाश्वतता आणि नागरिकांचे सर्वेक्षण याचा समावेश होतो. राहणीमानात परवडणारी घरे, शुद्ध पाण्याची उपलब्धता, मूलभूत शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, सुरक्षा आदीचा समावेश आहे.

10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गटातील शहर :
1) बंगळुरू, 2) पुणे, 3 ) अहमदाबाद, 4) चेन्नई, 5) सुरत, 6) नवी मुंबई, 7) कोयम्बतूर, 8) वडोदरा, 9) इंदौर, 10) मुंबई.

दरम्यान 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा समावेश होऊ शकलेला नाही. यामध्ये शिमला Ease of Living Index मध्ये अव्वल ठरले आहे.

10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटातील शहरे :
1) शिमला, 2) भुबनेश्वर, 3) सिल्वासा, 4) ककिनाडा, 5) सालेम, 6) वेल्लोर, 7) गांधीनगर, 8) गुरुग्राम, 9) देवांगरे, 10) तिरूचिरापल्ली आदी.