लोकसभेच्या अंदाज कमिटीच्या अध्यक्षपदी खा. गिरीश बापट यांची फेरनिवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-  लोकसभाच्या अंदाज कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ही निवड एक वर्षासाठी आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी खासदार बापट यांच्या निवडीची घोषणा केली. खा. बापट एक मे 2021 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

या समितीमध्ये 30 खासदारांचा समावेश आहे. बापट यांच्याकडे सलग तिसऱ्या वर्षी हे अध्यक्षपद आले आहे. त्याची घोषणा होताच बापट यांच्या चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लोकसभेमध्ये सादर झालेल्या विविध प्रकारच्या अंदाजपत्रकाची छाननी करणे. त्याची तपासणी करणे व केंद्र सरकारला सूचना करणे. यासाठी 1950 पासून ही समिती अस्तित्वात आली. प्रशासकीय सुधारणा सुचविणे. अंदाजपत्रकाच्या मर्यादेत खर्च झाला की नाही ? याची पाहणी करणे. प्रशासनाची कार्यक्षमता व त्याचे अर्थकारण याविषयी सल्ला देणे व अंदाजपत्रका बाबत धोरणात्मक प्रस्ताव देणे. अशा प्रकारची कामे ही समिती करते. यापूर्वी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी या समितीचे अध्यक्ष होते. एका पत्रकाद्वारे बापट यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.