Corona Virus : ‘कोरोना’चा महाराष्टाला मोठा ‘फटका’, सुमारे 150 कोटींचं ‘नुकसान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या व्हारसचा परिणाम चीनमधील अनेक उद्योग धंद्यांवर झाला आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसला असून कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्राला देखील बसला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राचे तब्बल 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकन खाल्यामुळे कोरोना व्हायरस होतो, अशी अफवा पसरली आणि त्याची धास्ती घेऊन अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली. याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला असून तब्बल 150 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने पत्रकार परिषदेत दिली.

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी रोजी चिकनचा दर ठीक होता. मात्र, चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हारस होतो अशी अफवा 4 फेब्रुवारीला पसरली. त्यामुळे याचा परिणाम चिकन विक्रीवर झाला आणि चिकनचा खप कोसळला. हा खप 3 हजार 500 मेट्रिक टनावरून 2000 मेट्रिक टन म्हणजे तब्बल 20 लाख किलोवर आला. त्यामुळे 150 कोटीचे नुकसान झालं आहे. अंडे विक्रीवर मात्र याचा काहीही परिणाम झालेला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चिकन खाल्याने कोरोना होतो या अफवेवर राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म उत्पादकांचं नुकसान झालं असल्याचे गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. राज्यात 60 टक्के मांसाहारी लोक आहेत. तर 7 कोटी 42 लाख कुक्कुट पक्षी आहेत. आता हा खप 2400 मेट्रिक टनापर्य़ंत वाढला असल्याचे पशुसंवर्धन विभागानं सांगितलं.

अफवेवर विश्वास ठेवू नका
चिकन खाल्याने कोरोना होतो अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही असे खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. तसेच केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने देखील हे स्पष्ट केले आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले.