PM मोदींचे पेट्रोल पंपावरील होर्डींग 72 तासात हटवा – निवडणूक आयोग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग 72 तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपचालकांना दिला आहे. तसेच कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरलेला मोदींचा फोटोही हटविण्यास आयोगाने सांगितले आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगने हा आदेश दिला आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी आदी 5 राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू केली आहे. तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरून आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरलेला मोदींचा फोटोही 72 तासांत हटवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू झालेली असतानाही तृणमूल कॉंग्रेसचे दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखावे अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.