नरेंद्र मोदींचे ‘ते’ भाषण तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने बनवली समिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्‍या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी भारताने बुधवारी घेतली. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवरुन देशाला संबोधित करताना मिशन शक्तीची माहिती दिली. मोदींच्या घोषणेने आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. निवडणूक आयोगाने मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणाची दखल घेतली असून अधिकाऱ्यांच्या समितीला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या ‘मिशन शक्ती’ या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भाषणाची प्रत आयोगाने मागितली आहे.

मोदींचे भाषण तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने समिती बनवली असून आदर्श अचारसंहिता विभागाचे निवडणूक उपायुक्त डॉ. संदीप सक्सेना या समितीचे प्रमुख आहत. ते या प्रकरणाचा तपास करतील. या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी निवडणूक आयोगाच्या चौकशी समितीतील अधिकारी करणार आहेत.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप –

मोदींनी भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसंच निवडणुकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असं येच्युरी यांनी पत्रात म्हटलं आहे.