‘मैं भी चौकीदार’ वरून दूरदर्शनला नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मैं भी चौकीदार या कार्यक्रमाचे दीड तासाचे थेट प्रक्षेपण दाखविल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दूरदर्शनला नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणूकीची तारीख जवळ आलेली असताना निवडणूक आयोगाने आक्रमक भूमिका घेतली असून दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नरेंद्र मोदी यांनी ३१ मार्च रोजी मैं भी चौकीदार हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ५०० ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयममध्ये हा कार्यक्रम पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण रेडीओ, टिव्ही आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले. दूरदर्शनने हा दीड तासांचा कार्यक्रम लाईव्ह दाखवला होता. त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.