संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांना आचारसंहिता भंगाची नोटीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परवानगिशिवाय युट्यूबवर प्रचार केल्याप्रकऱणी त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची नोटीस काढण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. सोशल मिडीयावरील प्रचाराची देखील दखल घेतली जात आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ७६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार संजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी विनापरवाना युट्यूबवर प्रचार केल्याने त्यांना ४८ तासात खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ७६ तक्रारींपैकी ७१ तक्रारी या उत्पादन शुल्क विभागाच्या आहेत. पोस्टर्स, विना परवाना वाहनांवर झेंडे लावल्याचे तसेच अन्य असे ४ गुन्हे दाखल आहेत. सोशल मिडीयावरील प्रचाराची विशेष पथकामार्फत देखरेख केली जात आहे. तक्रार आल्यास चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

त्यासोबतच सांगली महापालिकेतर्फे गाळे वाटप करण्यात येणार आहेत. त्याचे भूमीपुजन झाले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याची चौकशी करून आचारसंहिता भंग झाली असल्यास कारवाई करण्यात येईल.