होय, निवडणुकीदरम्यान ‘मावळ’मध्ये पैशांचा ‘पाऊस’ झाला ; भरारी, तपासणी पथकाकडून 28 लाख जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ लोकसभा मतदार संघ हा वेगेवगळया कारणामुळे लक्षवेधी मतदार संघ बनला होता. शिवसेनेकडून श्रीरंग बारणे तर राष्ट्रवादीकडून पार्थ अजित पवार हे निवडणूकीच्या रिंगणात होते. दोन्ही पक्षांनी आप-आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले. दरम्यान, निवडणूक काळात पैशांच्या व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर होती. आयोगाच्या भरारी पथकाने तसेच तपासणी पथकाने निवडणूकीच्या दरम्यान तब्बल 28 लाख 28 हजार रूपये जप्‍त केले आहेत.

जप्‍त केलेल्या एकुण रक्‍कमेपैकी सर्वाधिक 13 लाख रूपये हे मावळ विधानसभा मतदार संघातुन जप्‍त करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने तब्बल 28 तपासणी नाके उभारले होते. संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत होती. काही ठिकाणी तर चक्‍क वेगवेगळया पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच पैसे वाटप करताना ताब्यात घेण्यात आले. संबंधितांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली. लक्षवेधी बनलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात सर्वाधिक रक्‍कम दि. 25 ते दि. 29 एप्रिलच्या दरम्यान जप्‍त करण्यात आली. एवढेच नव्हे तर पैशांचे वाटप केल्याप्रकरणी एका माजी आमदाराविरूध्द पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत एक गुन्हा देखील दाखल करण्यात आला. एकंदरीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच इतर तपासणी पथकांनी जप्‍त केलेल्या रक्‍कमेवरून मावळ लोकसभा मतदार संघात पैशांचा ‘पाऊस’ झाल्याचे चित्र डोळयासमोर उभे रहाते.

भरारी व तपासणी पथकांनी केलेल्या कारवाईची विधानसभा मतदार संघानुसार आकडेवारी

तारीख                    विभाग रक्‍कम
दि. 5 एप्रिल             मावळ 79,200
दि. 9 एप्रिल             मावळ 6,00,000
दि. 19 एप्रिल           मावळ 5,00,000
दि. 25 एप्रिल           मावळ 1,38,000
दि. 4 एप्रिल             चिंचवड 85,000
दि. 20 एप्रिल          चिंचवड 1,12,000
दि. 29 एप्रिल          पिंपरी 48,500
दि. 27 एप्रिल          उरण 3,21,550
दि. 27 एप्रिल          पनवेल 9,00,000