आचारसहिंता लागू झाल्यानंतरही तिकिटांवर मोदींचे फोटो ; रेल्वे, हवाई वाहतूक मंत्रालयाला निवडणूक आयोगाची नोटिस

तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील रेल्वेचे आरक्षित तिकीट आणि विमानांच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का हटवला नाही, असा सवाल निवडणूक आयोगाने संबंधित दोन्ही मंत्रालयाकडे केला आहे. तसेच तीन दिवासांत त्याचे उत्तर मागितले आहे.

लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतरही रेल्वेची तिकीटे आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे हटवण्यात आलेली नाहीत. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून रेल्वे मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतून मंत्रालयालाकारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश रेल्वे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत.

विविध सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा वापर होत असतो. रेल्वेची तिकिटे आणि एअर इंडियाच्या विमानांच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे छापून विविध योजनांची माहिती देण्यात येते. मात्र, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे रेल्वेची तिकिटे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवरून हटवणे आवश्यक होते.