विधानसभा 2019 : उद्या निवडणूक आयुक्‍तांची पत्रकार परिषद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा बुधवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, निवडणूक जाहीर होणार नाही. राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पथक राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (दि.17) राज्यात आले आहे.

निवडणुका जाहीर करण्यापूर्वी हे पथक दोन दिवस राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे, आयकर विभाग, उत्पादन शुल्क आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहे. तसेच हे त्रिसदस्यीय पथक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्या सोबत देखील बैठक घेणार आहे. तीन सदस्यीय पथकाने दोन दिवस पाहणी आणि बैठक घेतल्यानंतर गुरुवारी (दि.19) निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.

राज्यातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते. तर यंदा झारखंडमध्ये वेगळा पॅटर्न पहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत या ठिकाणी पाच टप्प्यांत मतदान झाले होते. यंदा महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्येही विधानसभेची निवडणूक पार पडणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या तारखा जाहिर झाल्यानंतर आम्हाला तयारीसाठी किमान 35 दिवसांचा अवधी लागतो. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. यंदा दिवाळी 27 ऑक्टोबर रोजी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडे अतिरिक्त पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे.

You might also like