PMC घोटाळा : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी MD जॉय थॉमस यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) प्रकरणात बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांना अटक केली आहे. यापूर्वी पीएमसी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ६ ठिकाणी छापा टाकला होता. दरम्यान, गुरुवारी पीएमसी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली हौसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या दोन संचालकांना देखील अटक करण्यात आली. या दोघांनाही ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. एचडीआयएलची ३५०० कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली आहे. सरकारने दोन्ही संचालकांविरूद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले होते. तसेच दोन्ही संचालकांनी देश सोडून पळून जाऊ नये यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश सरकारने इमिग्रेशन अथॉरिटीला दिले होते.

काय आहे पीएमसी घोटाळा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बनावटगिरी, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात आठवड्याच्या सुरूवातीस मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की प्राथमिक तपासणीनुसार २००८ पासून बँकेचे ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. FIR मध्ये पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरम सिंग, मॅनेजर डायरेक्टर जॉय थॉमस, एचडीआयएलचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

जॉय थॉमस यांनी दिली चुकीची कबुली
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांनी एचडीआयएलला २५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात आपली चूक कबूल केली. एनपीए प्रकरणात बँकेच्या माजी व्यवस्थापनाने संचालक मंडळाला अंधारात ठेवले असल्याचे त्यांनी कबूल केले होते.

सकाळी झाली ईडीची छापेमारी
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक पीएम प्रकरणातील घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी मुंबई व त्याच्या आसपासच्या भागातील सहा ठिकाणी छापे मारले आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की ईडीने मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली, त्यानंतर छापे टाकण्यात आले. ईडी प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EFO) दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे.

ईडीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले. ईडी आणि मुंबई पोलिसांचे प्रकरण हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे माजी बँक व्यवस्थापन आणि प्रवर्तकांविरूद्ध आहे.

शुक्रवारी पोलिसांनी एचडीआयएलच्या दोन्ही प्रवर्तकांना न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने एचडीआयएलचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक सारंग वधवन आणि कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवन यांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.