काय सांगता ! होय, पाकिस्तान तब्बल 80 हजार गाढवं चीनला पाठवणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे. दुसरीकडे मात्र आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सरकारचे आर्थिक सल्लागार अब्दुल हफिज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार 2019-20 मध्ये गाढवांची संख्येत 1 लाखांची वाढ झाली. या वाढीनंतर पाकिस्तानातील गाढवांची एकूण संख्या 55 लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

गाढवांसदर्भात पाकिस्तान आणि चीन यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार पाकिस्तान दरवर्षी 80 हजार गाढवांची रवानगी चीनला करतो. चीनमध्ये त्याचा वापर मांसासाठी तसंच अन्य बाबींसाठी केला जातो. गाढवांच्या कातडीचाही उपयोग चीनमध्ये करण्यात येतो. त्यांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटिनपासून अनेक प्रकारची औषधंही तयार केली जातात. चीनच्या काही कंपन्यांनी पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गाढवांची संख्या अधिक असलेला पाकिस्तान जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

गाढवांच्या प्रकारानुसार त्यांचे दर निश्चित केले जातात. काही अहवालांनुसार, पाकिस्तानात एका गाढवाच्या कातडीसाठी 15 ते 20 हजार रूपये आकारले जातात. याची विक्री करून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. तर दुसरीकडे गाढवांच्या उपचारांसाठी पाकिस्तानात विशेष रुग्णालयंदेखील आहेत.