मोठी कारवाई ! फरार हिरा व्यापारी नीरव मोदीची तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फरार हिरे व्यापारी नीरव मोदीवर इंफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने मोठी कारवाई केली आहे. नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची संपत्ती जबरदस्त आर्थिक गुन्हे कायद्यांतर्गत जप्त केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यात पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आता नीरवच्या सर्व मालमत्तांवर भारत सरकारचा अधिकार आहे.

ही संपत्ती झाली आहे जप्त
ईडीने म्हटले आहे की, नीरव मोदीच्या जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील चार फ्लॅट, अलिबागमधील जमीन, एक फार्महाऊस, लंडनमधील फ्लॅट्स, युएईमधील फ्लॅट, जैसलमेरमधील एक पवनचक्की आणि बँकांमध्ये असलेले पैसे आणि शेअर्सचा समावेश आहे. ईडीच्या या मोठ्या कारवाईमुळे नीरव मोदीचे खूप नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यापूर्वीही ईडीने नीरव मोदीवर जप्तीची कारवाई केली आहे.

मार्च महिन्यात झाला होता लिलाव
मार्च २०२० मध्ये झालेल्या त्याच्या मालमत्तांच्या लिलावातून ५१ कोटी प्राप्त झाले होते. ही मालमत्ता ईडीनेच जप्त केली होती. लिलावात झालेल्या मालमत्तांमध्ये रोल्स रॉयस कार, एमएफ हुसेन आणि अमृता शेर-गिलच्या पेंटिंग्ज आणि डिझायनर हँडबॅग्जचा समावेश होता. यापूर्वी सॅफरॉन आर्टने मार्च २०१९ मध्ये नीरव मोदीच्या मालकीच्या काही कलाकृतींचा लिलाव केला होता, त्यात ५५ कोटी रुपये जमा झाले होते.

१४ हजार कोटींपेक्षा जास्त फसवणूकीचा गुन्हा
नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकसह (पीएनबी) १४,००० कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी देशातून फरार असून सध्या लंडनच्या तुरूंगात कैद आहे.