चौकशी विना गुन्हा दाखल केल्यानं ‘ED’ अडचणीत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीच्या कामकाजाच्या पद्धतीविरुद्ध जाऊन कोणताही थेट संबंध नसताना कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केल्याने आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) अडचणीत आली आहे. त्याचबरोबर भाजपा आपल्या विरोधकांना धमकाविण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर करीत असल्याचा होत असलेला आरोप या कारवाईमुळे अधिक ठळक झाला आहे.

एखादी संस्था, कंपनीतील आर्थिक अनियमितता, घोटाळ्याबाबत ईडीकडे तक्रार आली तर अगोदर त्याची प्राथमिक चौकशी केली जाते. संबंधितांला बोलावून माहिती घेतली जाते. त्यानंतर त्यात दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. ही ईडीच्या कामकाजाची पद्धत आहे. कोहिनूर मिल च्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयाने ईडीने गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उमेश जोशी तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतरांना चौकशीसाठी बोलावले होते. राज ठाकरे यांची दिवसभर चौकशी केली होती. मात्र, अजूनही या प्रकरणी प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात या नेहमीच्या पद्धतीचा वापर न करता थेट गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय गुन्हा दाखल करताना शरद पवार वगळता अन्य नेते हे बँकेचे आजी माजी संचालक व अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आला आहे. मात्र शरद पवार यांच्या बाबतीत तसे काहीच नसल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याबाबत अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ईडी बॅकफुटवर आली आहे.

राष्ट्रवादीची राज्यात ठिकठिकाणी आंदोलने –
शरद पवार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या विरोधात बारामतीत बंद पाळण्यात आल्यानंतर आता हे लोण राज्यात पसरु लागले आहे. राज्यातील विविध शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंद पाळण्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बंद चे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. तसेच अनेक शहरांमधून अशा घोषणा होऊ लागल्या असून अनेक ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत.

Visit : policenama.com