ईडी कडून डीएसके ग्रुप ऑफ कंपनीची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात डीएसके ग्रुप ऑफ कंपनीची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने डीएसके ग्रुप ऑफ कंपनीची जमीन, इमारत, फ्लॅट, एलआयसी पॉलीसी, कॅश डिपॉझीट जप्त केले आहेत.

ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके ग्रुपवर पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. डीएसके यांनी तब्बल ३५ हजार गुंतवणुकदारांची १ हजार १२९ कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यानंतर डीएसके यांना दिल्लीत अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली.

डीएसकेंच्या भागीदारीमधील आठ कंपन्या रजिस्टर आहेत, तर ३० कंपन्या रजिस्टर नसून या कंपन्यांत देखील गुंतवणुकदारांचा पैसा गुंतविण्यात आला आहे. डी. एस. कुलकर्णी यांची ‘डी.एस.के.डी.एल’ ही प्रमुख पब्लीक इस्टेट कंपनी आहे. या कंपनीतून सर्व व्यवहार सुरू असताना त्यांनी ठेविदारांचा आणि बँकांकडून कर्ज घेतलेला पैसा वळविण्यासाठी ‘डी.एस. कुलकर्णी अँड कंपनी’, ‘डी.एस. कुलकर्णी अँड असोशिएट’, ‘डी.एस. कुलकर्णी अँड असो’, ‘डी.एस. कुलकर्णी अँड एंटरप्रायझेस’,‘डी.एस. कुलकर्णी अँड ब्रदर्स’, ‘डी.एस. कुलकर्णी अँड सन्स’, ‘डी.एस.के. अँड सन्स’, ‘डी.एस.के. कंट्रक्शन’ या आठ पार्टनरशिप कंपन्यांचा वापर केला आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाची परवानगी घेऊन चौकशी केली. डीएसके यांनी पैसे नेमका कोठे वळविला, याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली.