Pune News : ED चे अधिकारी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या भेटीसाठी पुण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये असताना असताना दाखल असणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी (ईडी) अ‍ॅड. असीम सरोदे यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील कार्यालयात येणार आहेत. याप्रकरणाची कागदपत्रे सरोदे यांच्याकडे असल्याने ते येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत असीम सरोदे यांनी सांगितले, भोसरीतील एका भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. खडसे यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून ही जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. बनावट कंपन्यांच्या मार्फत व्यवहार करून या जागेचा ताबा घेण्यात आला होता. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात याप्रकरणी अजूनही या खटल्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात अ‍ॅड. असीम सरोदे हे अंजली दमानिया त्यांचे वकील म्हणून काम पाहत आहेत.

त्यामुळेच या सर्व प्रकरणाची कागदपत्रे सरोदे यांच्याकडे आहेत. हे कागदपत्र सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयाला पाहिजे होती. त्यामुळे चौकशी यंत्रणेला मदत करण्यासाठी म्हणून ही कागदपत्रे मी त्यांना देणार आहे. ही कागदपत्र न्यायालयातून घेण्याची प्रक्रिया लांबलचक असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे ही कागदपत्रे घेण्यासाठी ईडीचे अधिकारी माझ्या कार्यालयात येत असल्याचे सांगितले.