‘जलयुक्त शिवार’ची चौकशी सुरू करताच ED नं झटकली जलसिंचन घोटाळ्याच्या फाईलीवरील धूळ ! अजित पवार, सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढणार

मुंबई- पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्वकांक्षी अशा जलयुक्त शिवाय योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला असतनाच अंमलबजावणी संचालयनालयाने (ईडी) जलसिंचन घोटाळ्याच्या फाईल बाहेर काढली आहे. त्यामुळे येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या मागे चौकशीच्या फे-या लागणार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष तपास पथकाने क्लीन चीट दिली.

त्यानंतर आता या प्रकरणी ईडी सक्रीय झाल्याने उपमुख्यमंत्री पवार आणि तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विदर्भ, कोकण, तसेच कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाकडे सिंचन प्रकल्पाशी संबधित कागदपत्रे ईडीने मागवली आहेत. 1999 ते 2009 या कालावधीतील निविदा प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना दिलेली रक्कम आदी कागदपत्रे ईडीने मागवली आहेत.

सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्चूनही दहा वर्षात केवळ 0.1टक्के जमीन ओलीताखाली आल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात (कॅग) नमूद केले आहे. तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीतून बाहेर आलेल्या या प्रकरणाने विरोधी पक्ष असलेल्या भाजपला आयतेच कोलीत मिळाले होते. तेंव्हा कॅगच्या शे-याने सिंचनाचा मुद्दा ऐरणीवर आलाहोता. आताही कॅगच्या निष्कर्षाचा आधार घेत महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकाच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काही दिवस उलटत नाही, तोच ईडीने सिंचन प्रकल्पाबाबत सक्रीया दाखवत या फाईलवरील धूळ झटकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तूमची एसआयटी तर आमची ईडी असा खेळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगतोय काय याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान सिंचन प्रकल्पासंर्दभात लाखभर कागदपत्रे न्यायालयात आहेत. यापूर्वीच्या दोन्ही तपास यंत्रणेच्या चौकशी दरम्यान जलसंपदा विभागाने संबधीत कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. आवश्यकता असेल तर ईडी ती कागदपत्रे कधीही पाहू शकते.

हा निव्वळ योगायोग नव्हे
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे आदेश होताच सिंचनाच्या घोटाळ्याबाबत ईडीने महत्वाचे दस्ताऐवज मागणे हा नक्कीच योगायोग नसल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली आहे.