सरनाईक यांच्या घरी व कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर केली सडकून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापेमारी केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप सरकारमधील मंत्र्यांनी केला असून, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जुंपल्याच पाहायला मिळत आहे.

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक घरी नसताना धाडी टाकण्यात कसली मर्दानगी, अशी विचारणा केली होती. त्यावर अभिनेत्री कंगना राणौत कार्यालयात नसताना, ती मुंबई बाहेर असताना तिचे कार्यालय बुलडोझर लावून पाडण्यात कोणती मर्दानगी होती, असा प्रतिसवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केला आहे. मर्दानगीच्या व्याख्या सोयीनुसार बदलतात का, असा खोचक प्रश्नसुद्धा त्यांनी राऊत यांना विचारला आहे.

ईडी स्वायत्त संस्था
ईडीने कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचे मी ऐकले नसून, त्यांना मी १०० जणांची नावे देतो. ईडीने त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले होते. त्यावर दरेकर म्हणाले की, ‘इतका वेळ १०० जणांची यादी राऊत यांनी कशासाठी
स्वतःजवळ ठेवली ? त्यांनी ती यादी तात्काळ ईडीला द्यावी. ईडी स्वायत्त यंत्रणा आहे. त्यामुळे राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून उगाच मोदी सरकारवर टीका करू नये,’ असेही त्यांनी म्हटलं.

कारवाई राजकीय हेतूने – राऊत
हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, कितीही दबाव आणला तरी महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण सुरुवात तुम्ही केली असेल, तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित आहे. पण अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. त्याचसोबत सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.