काय सांगता ! होय, YES बँकेकडून कर्ज देण्याच्या बदल्यात राणा कपूरनं घेतली 5000 कोटींची लाच, ED चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँकेचे संस्थापक राणा कपूर हे सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) ताब्यात आहेत. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत सातत्याने नवीन खुलासे केले जात आहेत. 20 हजार कोटींच्या कर्जाच्या बदल्यात राणा कपूरने कमीतकमी 5 हजार कोटींची लाच घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. या पैशांनी त्याने देशातून ते परदेशापर्यंत अनेक ठिकाणी मालमत्ता विकत घेतली.

भारतात आणि परदेशात मालमत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, राणा कपूर यांनी यूकेच्या एका हॉटेलमध्ये 30 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.याव्यतिरिक्त, न्यूयॉर्कमधील काही हॉटेल्समध्ये देखील गुंतवणूक केली गेली. कपूर यांनी दिल्लीच्या पॉश भागात आपल्या कुटुंबासाठी 5 मालमत्ता विकत घेतल्याचे समजते. तसेच भारता व्यतिरिक्त, कपूरने अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये मालमत्ता खरेदी केल्या, ज्यांची किंमत किमान 5 हजार कोटी रुपये सांगितले जात आहे.

कर्जाच्या बदल्यात 380 कोटींचे घर 
ईडीनुसार, राणा कपूरची पत्नी बिंदू यांनी उद्योगपती गौतम थापर यांच्याकडून दिल्लीतील अमृता शेरगीर मार्गावर घर विकत घेतले. थापर यांनी कर्जासाठी आपले घर गहाण ठेवले. मात्र, नंतर हे घर कपूरच्या पत्नीला 380 कोटी रुपयांना विकण्यात आले. ईडी याचाही तपास करीत आहे. आधीपासूनच डिफॉल्टर असलेल्या अशा कंपन्यांना राणा कपूर कर्ज देत आणि त्याऐवजी त्यांच्याकडून लाच घेत.

16 मार्च पर्यंत ताब्यात घेतले
दरम्यान, मुंबईतील विशेष कोर्टाने बुधवारी, 16 मार्चपर्यंत राणा कपूरच्या कोठडीत वाढ केली. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने कपूरला ताब्यात घेतले आहे. कपूरचा अटकेचा कालावधी 11 मार्चपर्यंत होता. ईडीने सांगितले की, यातील 20 हजार कोटींची कर्जे एनपीए झाली. ह्या पैशांची हेराफेरी कशी झाली, याचा आम्हाला सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांनतर ईडीने कोर्टाकडे कोठडीची मुदतवाढ देण्याची मागणी केली.