… तर यंदाचे सण ठरणार महागडे, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना आता सणासुदीच्या काळात खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. तेलांच्या किंमतीत जवळपास २५ टक्क्यांची वाढ झाली असून, आयात घसरल्याने देशात तुटवडा निर्माण झाला आहे. तेलाची साठेबाजी होत असल्याची शंकाही उपस्थित होत आहे. यावर तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास दसरा व दिवाळीत दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

देशात ४० टक्के खाद्य तेल बनवले जाते, तर ६० टक्के आयात करण्यात येते. दरवर्षी १५० लाख टन सोयाबीन व सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. कोरोनाचा प्रसार वाढल्यावर मार्च महिन्यात तेल आयातीवर त्याचा परिणाम झाला. देशभरात त्यामुळे तेलाचा तुटवडा भासू लागला. भारतात अमेरिका, अर्जेटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात तेल आयात होत असते. मात्र, या वर्षी तेथे समाधानकारक उत्पादन होणार नसल्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम तेलाच्या दरवाढीवर होत आहे.

मागील महिन्यात ९० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेलाची किंमत आता १३० रुपयांवर गेली आहे. सोयाबीन तेल ८५ ते ९० वरून १२० रुपयांवर, शेंगतेल १२० रुपयांवरुन १४० ते १६० रुपयांवर व पामतेल ९० ते ९५ रुपयांवरुन ११० रुपयांवर पोहचले आहे.

साठेबाजांरावर कारवाई करण्याची मागणी

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स सुरु झाली आहेत. तसेच आता दसरा, दिवाळी तोंडावर आली असून मागणी दुप्पट होणार असल्याने तेलाची साठेबाजी करण्यात येत आहे. या साठेबाजांवर कारवाईची मागणी होत आहे. तथापि, कोरोनाच्या अनुषंगाने पुरेशी आयत होऊ न शकल्याने त्याचा परिणाम दरांवर होत असून पुढील काही दिवस तेजी कायम राहील, अशी माहिती कृषी पणन व वायदेबाजार तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी दिली.

किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे दर

प्रकार सप्टेंबर ऑक्टोबर

सूर्यफूल ९०-१०० १२०-१३०
सोयाबीन ८५-९० ११०-१२०
पामतेल ८०-८५ ९०-११०
शेंगतेल ११०-१२० १४०-१५०